⛈️ काल मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. दक्षिण कोकणात हर्णेपर्यंत, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सोलापूर पर्यंत, मराठवाड्याच्या काही सलग्न भागापर्यंत मान्सून पोहचला होता. त्यानंतर आज त्याने पुढे कूच केली आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद आणि रायगड जिल्ह्यातील दक्षिण भागांत मान्सूनचे आगमन झाले आहे.
⛈️ यामुळे पुढील 3-4 तासांत पुणे, जळगांव, नंदुरबार, धुळे, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट, ढगांचा गडगडाट यांच्यासह मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
⛈️ यंदा मान्सूनचं आगमन वेळेच्या आधी झाल्याने उन्हाने त्रस्त असलेले नागरिक, बळीराजा सुखावला आहे. 1 जूनला केरळ तर 10 जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र केरळमध्ये 3 जूनला आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आणि आज मान्सूनने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली.
⛈️ येत्या 5 दिवसांत ईशान्य राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असल्याचे आयएडीचे म्हणणे आहे. तर पुढील 3-4 दिवस दक्षिण किनाऱ्यावर गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वायव्य भागांतही पावसाचा अंदाज आहे.