नमस्कार, मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत. मागील लेखात आपण मिर्झाराजे जयसिंग व पुरंदरचा तह पाहिला. तरी या लेखात आपण राजांची आग्रा भेट व बादशहाच्या हातावर तुरी पाहणार आहेत. तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा.
जयसिंगच्या शब्दांवर विश्वास ठेवून राजे आग्र्याला बादशहाच्या भेटीला जाण्यास तयार झाले. जाण्यापूर्वी राजांनी स्वराज्याचा सर्व कारभार आई जिजाबाई यांच्या हाती सोपवला. सोबत संभाजीराजे, निवडक सरदार व काही मावळे घेतले. सोबत खजिना घेतला व राजे मजल दरमजल करत आग्र्याला निघाले.
दरबारातील बानेदारपणा:-
आग्र्याला गेल्यावर ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारात गेले. सोबत युवराज संभाजी तर होतेच. त्यावेळेस औरंगजेबाचा वाढदिवस होता. बादशाह दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालात गेला. दरबारात सरदार आपल्या आपल्या मानाप्रमाणे रांगेत उभे होते. परंतु बादशाहने जाणूनबुजून राजांना मागच्या रांगेत मान दिला होता. एवढेच नव्हे तर मराठयांना कित्येकवेळा पाठ दाखवून पळून गेलेला जसवंतसिंह राठोड हा राज्यांच्या पुढच्या रांगेत उभा होता, हा एका प्रकारे शिवरायांचा भव्य अपमान होता. परंतु शांत बसतील ते राजे कसले, राजांचे डोळे लालबुंद झाले व राजे भर दरबारात कडकडले ‛ आम्ही स्वराज्याचे राजे, आमचा मान पुढच्या रांगेतील पण बादशाहने आपल्याला मागल्या रांगेत उभे करावे म्हणजे काय ? ‘ हा अपमान त्यांना सहन झाला नाही. राजे रागाने बाहेर पडले व आपल्या मुक्कामाकडे गेले. यापुढे बादशहाचे तोंड बघायचे नाही असे राजांनी ठरवले.
राजांच्या व बादशहाच्या भेटीच्या आधी झालेला हा प्रकार म्हणता म्हणता संपूर्ण आग्ऱ्यात पोहोचला. बादशहाचा असल्या प्रकारे भर दरबारात कोणी असे केले नव्हते.
बादशहाचा दगा:-
राजे आपल्या निवासस्थानी असताना त्याच्या निवासस्थानी सैन्याचा पहारा वाढवण्यात आला. राजांच्या हालचालीवर नियंत्रण बसवण्यात आले. राजांना लक्षात आले की बादशहाने आपल्या सोबत दगा केला आहे व राजे नजरकैदेत पडले. दिवसामागून दिवस जाऊ लागले. राज्यांनी कित्येक वेळेस बादशहाला पत्र लिहिले. आपल्याला स्वराज्याकडे जाण्याची परवानगी मिळावी म्हणून अर्ज केले, परंतु सर्व गोष्टी आता काही उपयोगात राहिल्या नव्हत्या. बादशाह आपल्याला जाऊन देणार नाही हे राज्यांच्या लक्षात आले होते.
आता राजांनी मनाशी निर्धार केला होता. काही करून बादशहाच्या कैदेतून बाहेर जायचे. आता राजांनी आपल्या सर्व सरदार व मावळ्यांना बादशहाच्या परवानगीने स्वराज्यात पाठवून दिले. या गोष्टीमागील हेतू औरंगजेबाच्या लक्ष्यात आला नाही परंतु राजांचे बळ कमी झाले या विचाराने औरंगजेब खुश होता. आता राजांसोबत फक्त हिरोजी फर्जंद , मदारी मेहतर व संभाजी महाराज फक्त एवढेच होते.
पुढे राजांनी एक दिवस आजारी पडल्याचे सोंग केले. शेवटी सोंगच ते! राजे काही बरे होईनात , ना हकीम, ना वैद्य, राजे काही बरे होईनात. मग राजे बरे व्हावेत म्हणून शिवरायांनी साधू व मौलविना मोठे मोठे पेटारे भरून मिठाई पाठवण्यास सुरवात केली.
बादशहाच्या हातावर तुरी:-
पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत , पण पुढेपुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले. रोजरोज काय पहायचे, असे त्यांना वाटले. हळूहळू राजांनी या गोष्टीचे निरीक्षण केले.
एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले, मदारीस पाय चेपत बसायला सांगून स्वतः व संभाजी राजांना एका एका पेताऱ्यात घातले. पेटारे निघाले व ठरलेल्या जागी सुखरूप पोहचले. तेथे राजांचे सहकारी राजांची सुरवातीपासून वाट पाहूनच होते. इकडे हिरोजी व मदारी महाराजांचे औषध आणायला म्हणून बाहेर पडले व तेथून निसटले. स्वतःच्या जीवावर उदार होऊन राजांसाठी, स्वराज्यासाठी त्याग करण्यास निघाले. काय होती ती स्वामी भक्ती?
दुसऱ्या दिवशी बादशहाला ही बातमी समजली. आता मात्र बादशहाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याचे सारे सरदार हादरले. शिवाजी राज्यांचा पत्ता लावण्यासाठी हेर तैनात केले. परंतु कैदेतून निघाल्यानंतर राज्यांचा स्वराज्याकडे निघण्याचा वेगच इतका तुफान होता की हेरानं खबर घेऊन चौकीपर्यंत यायच्या आतमध्ये राजे त्या चौकीच्या कित्येक पुढे पोहचलेले असत. वेषांतर करत, शत्रूला हुलकी देत असे करत करत राजे शेवटी आपल्या मुलखाजवळ पोहचले. परंतु राजांनी या अगोदर संभाजी राजांना मथुरेत सुरक्षित ठिकाणी ठेवले. संभाजी राजांना मागे सोडून जाणे राजांना खूप कठीण वाटत होते परंतु पर्याय नव्हता.
राजांनी राजगडाकडे वाटचाल सुरू केली. राजे सुखरूप गडावर पोहचले. नंतर काही दिवसांनी संभाजी राजे सुखरूप गडावर आले. असल्या प्रकारे राजांनी शक्तीपूढे युक्तीने बादशहाच्या हातावर तुरी दिल्या आणि आता मराठी साम्राज्याचा वाघ एकदा मुघलांच्या हातातुन सुटला तो कायमचाच ..सन1666 मधील ही घटना औरंगजेबाच्या चांगलीच जिव्हारी लागली.
पुढील लेखात आपण तानाजी मालुसरे व कोंढाणा पाहणार आहोत . तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत …
[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]