तुम्हाला माहित आहे का आपल्याला घाम का येतो व केव्हा येतो? जर आपण कधी आपल्या मित्रांना प्रश्न विचारला असेल तर, त्यांचे हेच उत्तर असेल आमच्या शरीरात जास्त उष्णता आहे म्हणून आम्हाला घाम येतो. पण आपल्याला यामागील वैज्ञानिक कारण माहित नसते. तर आपण आज यामागील खरे कारण आणि अजून काही मजेदार गोष्टी जाणून घेऊया.
आपल्याला घाम का येतो?
१. ज्यावेळेस आपण खूप घाबरलेले असतो त्यावेळेस आपल्याला घाम येतो.
२. जेव्हा आपल्याला एखाद्या मोठ्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण द्यायचे असेल, त्यावेळेसही आपल्याला घाम येतोच.
३. पण यापेक्षाही जास्त घाम आपल्याला त्यावेळेस येतो जेव्हा आपण खूप जास्त व्यायाम करतो किंवा जास्त कष्टाचे काम करतो.
त्यासाठीच आपण घामाविषयी ८ मजेदार गोष्टी जाणून घेऊया. जसे कि, आपल्याला घाम का येतो? आपल्याला घाम केव्हा येतो? आपल्याला घाम आल्यावर काय होते? जर आपल्याला घाम आलाच नाही तर काय होईल? तर चला पाहतोय ‘या’ ८ गोष्टी…
घामाविषयी ८ मजेदार गोष्टी
१. आपल्या शरीराचे तापमान किती असते हे तुम्हाला माहित आहे का? आपल्या शरीराचे साधारण तापमान ३७o सेल्सिअस एवढे आहे. हे तापमान आपण तापमापीच्या साहाय्याने मोजू शकतो. आपल्या शरीराचे तापमान हे या तापमानाच्या आसपास असायला हवे.
२. आपल्या शरीराचे तापमान जर ३०o सेल्सिअस पेक्षा कमी झाले तर… शास्रज्ञांच्या संशोधनानुसार बुरशीजन्य संसर्ग (fungal infection) ची वाढ ही ३०o सेल्सिअस तापमानाखाली होते. आणि जर आपल्या शरीराचे तापमान ३०o सेल्सिअस पेक्षा कमी झाले तर आपल्याला बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. बुरशीजन्य संसर्ग (fungal infection) हा एक त्वचारोग आहे.
३. आपल्याला घाम का येतो?
जसे कि आपल्याला आता कळालेच आहे, आपल्या शरीराची तापमान ३७o सेल्सिअस आहे. ज्यावेळेस आपण व्यायाम करत असतो त्यावेळेस आपल्या शरीरात उष्णता निर्माण होत असते. आणि आपल्या शरीराचे तापमान वाढते. आपल्या शरीराचे तापमान वाढले कि आपला मेंदू आपल्या शरीरातील घामाच्या ग्रंथींना(Sweat Glands) सूचना देतो. या घामाच्या ग्रंथी आपल्या त्वचेमध्ये असतात. घाम हा आपल्या त्वचेवर असणाऱ्या अतिसूक्ष्म छिद्रातून बाहेर येत असतो. आणि आपल्या शरीराचे तापमान कमी करत असतो.
४. आपला मेंदू घामाच्या ग्रंथींना सूचना देतो की शरीराचे तापमान कमी करा… पण आपल्या शरीरात या घामाच्या ग्रंथींची संख्या किती आहे? आपल्या शरीरात जवळपास ३० लाखांच्या आसपास घामाच्या ग्रंथी आहेत. लहान मुलामध्ये याचे प्रमाण कमी असते. या सर्व घामाच्या ग्रंथी आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करायचे काम करत असतात.
५. या घामाच्या ग्रंथी किती घाम तयार करू शकतात?
साधारणतः मोठ्या माणसामध्ये या घामाच्या ग्रंथी २ ते ४ लिटर घाम बनवू शकतात. पण लहान मुलामध्ये याचे प्रमाण कमी आहे.
६. या पृथ्वीतलावर सर्वात जास्त घाम येणारा प्राणी मानव आहे.
७. माणसाव्यतिरिक्त वेगवेगळे प्राण्यांच्या शरीराचे तापमान कसे नियंत्रित होते?
A. कुत्रा : कुत्र्याला आपण कधी घाम येताना पहिले नसेल. मग कुत्रा आपल्या शरीराचे तापमान कसे नियंत्रित करतो. कुत्र्याला पण घाम येत असतो पण तो त्याच्या पायांच्या पंज्यावर. पण त्या घामाचे प्रमाण खूप कमी असते. कुत्रा आपल्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कुत्रा बऱ्याचदा आपली जीभ बाहेर काढून बसतो. म्हणजे आपल्या शरीरातील गरम हवा शरीराबाहेर काढतो आणि थंड हवा शरीरात घेतो.
B. हत्ती : हत्तीला घाम येत नाही. हत्ती आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी आपल्या सुपासारख्या कानांना कायम हलवत असतो. हत्तीच्या कानामध्ये रक्ताच्या जास्त शिरा असतात. या शिरामध्ये हत्तीच्या शरीरातील गरम रक्त येते व ते थंड होऊन पुन्हा पूर्ण शरीरात पाठवले जाते. याव्यतिरिक्त हत्ती आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी बऱ्याचवेळा जास्तीत जास्त आपला वेळ पाण्यात घालतो. आणि आपल्या सोंडेत पाणी घेऊन पूर्ण शरीरावर त्या पाण्याचे फव्वारे मारतो.
C. ससा : आपण ससा पाहिला असेल तर सस्याचे कान हे नेहमी वर असतात. आणि सस्याच्या कानाची रचना आणि हत्तीच्या कानाची रचना जवळपास सारखीच असते, त्यामुळे आता आपण याविषयावर जास्त चर्चा करणार नाही.
८. जर आपल्याला घामच आला नसता तर…
जर आपल्याला घाम आला नसता तर आपल्याला “Anhidrosis” नावाचा आजार होण्याची शक्यता आहे. हा आजार झाल्यावर त्या व्यक्तीला खूप कमी घाम येतो. आणि आपल्या शरीराचे तापमान कायम जास्त राहते. अशा व्यक्तीला “उष्माघात” (Heat Stroke) होण्याची शक्यता आहे. व कधी कधी यामुळे त्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हांला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या संपर्कातील जेवढ्यांना घाम येतो किंवा येत नाही अशा सर्वाना हा लेख नक्की शेअर करा.