नमस्कार , मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या लेखांच्या मालिकेतून पाहणार आहोत .मागील लेखात आपण शिवरायांचे शिक्षण , पुण्याला पुनरागमन व कायापालट पहिला . तरी या लेखात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापन करण्याच्या प्रतिज्ञा व राजमुद्रा पाहणार आहेत .तरी अधिक माहिती वाचण्यासाठी आपण STAY UPDATED परिवारासोबत रहा .
पुण्याच्या नैऋत्येस रायरेश्वराचे रमणीय देवस्थान आहे . याचं मंदिरात 1645 मध्ये इतिहास बदलणारी घटना घडणार होती .
प्रतिज्ञा रायरेश्वरासमोर :-
शिवरायांना पुणे सुभेदारीचे अधिकार मिळाले होते . सर्व काही ठीक चालू होते परंतु जिजाबाई यांनी त्यांच्या डोक्यात स्वराज्याची संकल्पना घालून दिली होती . या कारणामुळे त्यांना आपले राज्य , लोकांचे राज्य , स्वराज्य या संकल्पनेने झपाटून टाकले होते . रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या वयाच्या काही मावळयातील मित्रांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली . या विचारानेच त्या तरुणांचे रक्त उसळले . “ स्वराज्य ” आपले राज्य , आपले अधिकार , आपल्या लोकांचा आधार या विचाराने सर्वांनी शिवरायांना साथ देण्याचे ठरवले .
रायरेश्वराच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा प्रण या सवंगाड्यांनी सोबत घेतला . यासाठी आपले प्राण गेले तरी चालेल परंतु परक्यांची गुलामी आता नाही असा विश्वास निर्माण झाला . आई जिजाबाईंच्या आशीर्वाद , श्री रायरेश्वर यांच्या समोर केलेला प्रण हे तर झाले . यामुळे सर्वांच्या मनात वेगळाच उत्साह निर्माण झाला . आता प्रतिज्ञा तर झाली काही मित्र सोबत होते , आपल्या लोकांसाठी लढण्याची इच्छा मनात होती आता पुढे काय ? हा प्रश्न तर साहजिकच होता .
रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगाड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञातर घेतली पण हे कार्य काय वाटते तेवढे सोपे नव्हते . त्या काळी महाराष्ट्रात दिल्लीचे मुघल , विजापूरचा आदिलशाह ,गोव्याचे पोर्तुगीज व जंजिऱ्याचा सिद्धी या सर्व सत्ता आपले प्रभुत्व निर्माण करू पाहत होत्या . या पैकी मुघलांचा मोठा दबदबा होता . यांच्या विरुद्ध ब्र शब्द काढण्याची कोणाची हिम्मत नव्हती . असल्या बिकट परिस्थिती यांनी आपल्या नवीन कार्याला प्रारंभ केला होता हीच गोष्ट अत्त्यांत मोठी गोष्ट होती .
सुरवात मावळे जमवण्याची :-
आता आपल्या नव्या उद्योगाला हे सर्व मावळे लागले . मावळ्यांना युद्धकलेची शिकवण सुरू झाली , डोंगरातील आडमार्ग शोधले , खिंडी , घाट , चोरवाटा सर्व काही सुरू झाले . या प्रक्रियेत नवीन मावळे मिळत गेले . सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आता सर्व काही यांना माहीत झाले . सर्वसाधारण लोकांची एक विश्वासू सेना तयार होऊ लागली .
पुणे सुभ्यातच अनेक देशमुख मंडळी आपल्या गावांची वतने सांभाळत होती . हे जमीनदार आपपल्यात लढत असत व वैर ठेवत असत . या सर्वांची भेट घेऊन त्याना आपल्या बाजूने वळवण्याचे कार्य सर्वात पहिली शिवरायांनी सुरू केले . काहींना गोड शब्दात तर काहींना तलवारीच्या धाकाने आपल्या बाजूने वळवले . झुंजारराव मरळ , हैबतराव शिलमकर , बाजी पळसकर , विठोजी शितोळे , जेधे , पायगुंडे , बांदल ही देशमुख मंडळी शिवरायांना मानू लागले .
राजमुद्रा राजांची :-
शिवरायांच्या नावाने जहागिरीचा स्वतंत्र कारभार सुरू झाला होता . आपल्या पुत्राने आपली जबाबदारी काही अंशी पत्कारली असे मन शहाजीराजांचे झाले . त्यानी शिवरायांना स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली . हीच राजमुद्रा पुढे शेवटपर्यंत स्वराज्याची ओळख राहिली . ती राजमुद्रा अशी –
प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।
‘प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’, असा त्याचा अर्थ. खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव सहज लक्षात येते . त्या काळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत कोरल्या जात . परंतु शिवरायांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती . स्वराज्य हवे तसेच स्वभाषा हवी , स्वधर्म हवा परंतु विशेष म्हणजे दुसऱ्या सर्व धर्माचा आदर हवा . हे शिवरायांनी काळानुसार सिद्ध केलेच .
पुढील लेखात आपण तोरण स्वराज्याचे तोरणागड विजय पाहणार आहोत . तरी वाचत रहा शिवचरित्र आपल्या STAY UPDATED परिवारासोबत …
[ टीप : हा लेख विविध पुस्तकांच्या वाचनातून तसेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून लिहण्यात आला आहे. तरी या लेखामध्ये काही चुका किंवा त्रुटी आढळ्यास आम्हाला कमेंट करून किंवा ७०२०३३३९२७ क्रमांकावर व्हाट्सअँप मेसेज करून नक्की कळवा . आम्ही लेखामध्ये त्वरित बदल करून घेऊ. ]