कोरोनाच्य़ा पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. याच आधारावर महाराष्ट्रातही राज्य शिक्षण मंडळ म्हणजेच एसएससी बोर्डाची दहावीची लेखी परीक्षा रद्द करण्याबाबत तज्ज्ञांशी बोलून निर्णय घेऊ, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय.
सीबीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केल्याने एसएससी बोर्ड परीक्षा रद्द करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
याविषयी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, “महाविकास आघाडी सरकारसाठीही विद्यार्थ्यांची सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे सीबीएसईप्रमाणेच परीक्षा रद्द करून ऑब्जेक्टिव्ह आणि इंटरनल असेसमेंट घेण्याबाबत आम्ही अभ्यास करू आणि तज्ज्ञांशी बोलू.”
केंद्रीय बोर्डाचा हाच निर्णय एसएससी बोर्डालाही घेता येणं शक्य आहे का? एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता गुण देणं शक्य आहे का? याचा अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेवर काय परिणाम होईल? अशा सर्व प्रश्नांचा आढावा आपण या बातीमीत घेणार आहोत.
केंद्र सरकारने नेमका काय निर्णय घेतला आहे ?
देशभरातील विविध राज्यांमध्ये होणारी सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने रद्द केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिआच्या आधारावर म्हणजेच वस्तुनिष्ठ निकष पद्धतीच्या आधारे जाहीर करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.
दहावीचे जे विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील त्यांना योग्य परिस्थिती असेल तेव्हा पुन्हा परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात येईल असंही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
बारावीच्या परीक्षेबाबत जून महिन्यात परिस्थितीचा अंदाज घेऊन बोर्ड निर्णय घेईल. संबंधित निर्णयाची माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यात येईल. परीक्षा सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधी कल्पना देण्यात येईल, असं केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
सीबीएसई बोर्ड दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण कसे देणार?
दरवर्षीप्रमाणे सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा लेखी स्वरुपात होणार नसल्याने वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारावर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आ
वस्तुनिष्ठ निकष म्हणजे विद्यार्थ्यांना नेमके गुण कसे मिळणार? याविषयी बोलताना सीबीएसई बोर्डाच्या पोद्दार शाळेच्या मुख्याध्यापिका अवनीता बीर सांगतात, “वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारावर म्हणजे केंद्रीय बोर्ड काही वेगळ्या पर्यायांचा विचार करत आहे असे दिसते. यात इंटरनल असेसमेंट, प्रोजेक्ट्स, असाईनमेंट्स किंवा ऑब्जेक्टिव्ह (MCQ) असे पर्याय असू शकतात. वर्षभरात शालेय स्तरावर घेतलेल्या अशाच परीक्षांच्या गुणांवरही निकाल जाहीर करू शकतात.”
परीक्षा न घेताच निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देणं योग्य ठरेल का? असाही प्रश्न आता विचारला जातोय.
“दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हातात अकरावी आणि बारावी असे दोन वर्ष आहेत. या दोन वर्षांत ते आणखी मेहनत घेऊ शकतात. अभ्यास करू शकतात. त्यामुळे मला वाटतं विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने हा निर्णय योग्य आहे,” असंही अवनीता बीर यांनी सांगितलं.
सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये लेखन पद्धती, प्रकल्प आणि वस्तुनिष्ठ अभ्यासक्रमावर भर दिला जातो. त्यामुळे वर्षभरात शाळेतील अशा विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत असतात.
“या गुणांच्या आधारे सीबीएसई निकाल जाहीर करू शकतं,” असं मत सोमय्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र पाठक यांनी व्यक्त केलं.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया साधारण जून अखेर ते जुलै महिन्यापासून सुरू होते. त्यामुळे यानुसारच सीबीएसई बोर्ड दहावीचा निकाल जाहीर करेल.
एसएससी बोर्डासमोरील अडचणी?
सीबीएसईप्रमाणेच एसएससी बोर्डाच्याही परीक्षा रद्द करता येऊ शकतात का? यावर विचार सुरू असल्याचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
एसएससी बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 21 मेपर्यंत होणार होती. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
एसएससी बोर्डाला दहावीची परीक्षा रद्द करायची असल्यास अकरावीचे प्रवेश कशाच्या आधारावर होणार? हे आधी ठरवावे लागेल असं शिक्षणतज्ज्ञ सांगतात.
सीबीएसई बोर्डाच्या बहुतांश शाळांची स्वत:ची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना ते प्राधान्य देऊ शकतात. पण एसएससी बोर्डाची विद्यार्थीसंख्या ही सीबीएसईच्या तुलनेत पाच पटींनी जास्त आहे.
एसएससी बोर्डाच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शाळांना जोडलेली कनिष्ठ महाविद्यालयं अपुरी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याला अकरावी प्रवेशासाठी शाळेबाहेर पडावे लागते.
राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होते. गुणवत्तेच्या आधारे होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षाही एकसमान पातळीवर घेणे एसएससी बोर्डासाठी नियमानुसार अनिवार्य आहे.
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र पाठक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “राज्य शिक्षण मंडळासाठी परीक्षा न घेणं हा पर्याय अडचणीचा ठरू शकतो. कारण परीक्षा न घेता निकाल कशाच्या आधारावर जाहीर करणार? आणि प्रवेश कसे देणार? एसएससी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा हा लेखी स्वरुपात असतो. शिवाय, अकरावीत प्रवेशासाठी निकाल आवश्यक आहे. तेव्हा बोर्डाला परीक्षा रद्द करण्यापूर्वी ठोस पर्याय शोधावा लागेल.”
सीबीएसई बोर्डाने ज्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे निकाल जाहीर करू असं म्हटलंय, एसएससी बोर्डासाठी हा पर्याय मात्र आव्हानात्मक आहे असं तज्ज्ञ सांगतात.
मुंबईतील बाल मोहन शाळेचे दहावीचे शिक्षक विलास परब यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, “MCQ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पद्धती अवलंबण्यासाठी आपल्याकडे सर्व विद्यार्थ्यांकडे इंटरनेट आणि संगणक किंवा मोबाईलची सुविधा असणं गरजेचं आहे. ही यंत्रणा तातडीने उभी राहू शकत नाही असं स्वत: शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.”
तसंच आपल्याकडे केवळ 20 गुणांची इंटरनल परीक्षा झाली आहे. त्यामुळे केवळ त्या आधारावर पूर्ण निकाल जाहीर करता येणार नाही, असंही ते सांगतात.
50 मार्कांचे प्रात्यक्षिक आणि 50 मार्कांची लेखी परीक्षा असे परीक्षा पॅटर्न असावे असं मत काही विद्यार्थ्यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले.
याविषयी बोलताना निवृत्त मुख्याध्यपक सुदाम कुंभार सांगतात, “असाईनमेंट विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या आहेत. आम्हीही शिक्षकांशी चर्चा करत आहोत. यापूर्वीच 50:50 या फॉर्म्युल्याचा विचार व्हायला हवा होता. 50 मार्कांचे प्रात्यक्षिक आणि 50 मार्कांची लेखीपरीक्षा हा सुद्धा पर्याय होता. पण याची तयारीही आधी होणं गरजेचं होतं.”
गेल्या महिन्यात बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, नाशिक जिल्ह्यांत ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी केली होती. पण ग्रामीण भागात ऑनलाईन परीक्षा घेणं शक्य नाही, असं यापूर्वीही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
पर्यायी परीक्षा पद्धती कोणती असू शकते?
राज्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताण पाहता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये, अशी भूमिका विद्यार्थी आणि पालक संघटनांची आहे.
परीक्षा रद्द करावी आणि सरसकट पास करावे अशीही मागणी यापूर्वी करण्यात आली आहे.
वर्षभरापासून लेखनाची सवय मोडल्याने लेखी परीक्षा वेळेत पूर्ण करणं कठीण आहे, अशा तक्रारी दहावीचे विद्यार्थी करत आहेत. यासाठी ऑनलाईन परीक्षांचा विचार व्हावा, असंही काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
मुख्याध्यापिका अवनीता बीर सांगतात, “सीबीएसईप्रमाणे वेगळा विचार राज्य शिक्षण मंडळानेही करायला हवा. परिस्थिती अपवादात्मक आहे त्यामुळे त्यावर उपाय काढण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल.”
शिक्षण विभाग काही पर्यायी परीक्षा पद्धतींचा विचार करू शकतं, असं दहावीचे शिक्षक विलास परब सांगतात.
“यावर्षी विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण ऑनलाईन झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी सोडवण्यासाठी काही असाईनमेंट्स दिल्या आणि त्याचे गुण ग्राह्य धरले तरी ते गैर ठरणार नाही. ‘ओपन बुक’ परीक्षा होते तशीच ऑनलाईन शाळा सुरू असताना परीक्षा घेता येऊ शकते,” असं विलास परब सुचवतात.
ते पुढे सांगतात, “आपल्याकडे स्कॉलरशीप परीक्षा होतात. त्या ओएमआर पद्धतीने घेतल्या जातात. यात मुलांना पर्याय निवडायचे आहेत. या परीक्षेसाठी आपल्याकडे तयार यंत्रणा आहे. नऊ विषयांची परीक्षा आहे.
प्रत्येक विषयाचे एकूण गुण कमी केले तर एका दिवसातही ही परीक्षा घेता येणं शक्य आहे,”
“यामुळे उत्तरपत्रिका तपासणी रखडणार नाही. निकाल वेळेत जाहीर होईल आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी तयारी करण्यास आपल्याला पुरेसा वेळ मिळेल,” परब सांगतात.
राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द करावी अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
शिक्षक महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर सांगतात, “70-80 टक्के विद्यार्थी आपल्याच शाळेच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेत असतात. तेव्हा परीक्षा केवळ उर्वरित विद्यार्थ्यांची घेण्यात यावी. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत अकरावीत प्रवेश घेण्याचा पर्याय नसेल किंवा ज्यांना इतर महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्यांची परीक्षा घेतल्यास परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल.”